Pune ST Bus | बीड-पुणे एस.टी. बसमधील एका महिलेला अचानक रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्यानंतर बस थांबवण्यासाठी वाहकाने तिच्याकडून शंभर रुपये मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी (४ जून) घडली असून, संबंधित महिलेच्या कुटुंबाने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत संबंधित वाहकावर कारवाईची मागणी केली आहे.
Shocking in Pune ST Bus: Conductor Demands ₹100 to Stop Bus for Sick Woman with BP Emergency
महिला तिच्या दोन लहान मुलांसह पाथर्डी येथून बीड-पुणे (MH12 AU 2535) बसमध्ये प्रवास करत होती. तिने तिकीट देखील काढले होते. मात्र बस तिसगावजवळ आली असताना तिला चक्कर येऊ लागली. तिने बस थांबवण्याची विनंती केली असता वाहकाने “शंभर रुपये दिल्याशिवाय बस थांबवणार नाही,” अशी बेकायदेशीर भूमिका घेतली. (Pune ST Bus)
रक्तदाब वाढत गेला, पतीने पाठलाग केला आणि अखेर पैसे दिल्यावरच बस थांबली :
महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने पतीला फोन करून घटनेची माहिती दिली. पतीने तत्काळ स्वतःचे वाहन घेऊन बसचा पाठलाग सुरू केला. करंजी गाव ओलांडूनही बस थांबवली गेली नाही. दरम्यान, महिलेला अधिक त्रास होऊ लागला. अखेर करंजी घाट संपल्यानंतर तिने वाहकाला शंभर रुपये दिले, त्यानंतरच बस थांबवण्यात आली. (Pune ST Bus News)
वाहकाने महिलेला आणि तिच्या मुलांना बसमधून उतरवले. काही वेळातच तिचे पती तिथे पोहोचले आणि पत्नीला उपचारासाठी पाथर्डीतील रुग्णालयात दाखल केले. या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला.
Pune ST Bus | कायदेशीर कारवाईची मागणी :
या घटनेमुळे एस.टी. महामंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महिलेकडून जबरदस्तीने पैसे घेणे आणि आजारी असतानाही बस थांबवण्यास नकार देणे हे अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी वाहकावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सध्या या घटनेची चौकशी होणार की नाही आणि वाहकावर काय कारवाई केली जाईल, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.