Nashik Crime | गोळीबार, धमक्या आणि जबरदस्तीने जमिनीचा ताबा घेण्याच्या प्रकरणांमध्ये आधीच चर्चेत असलेल्या बागुल टोळीवर आता आणखी एक गंभीर आरोप लागला आहे. विसे मळा गोळीबारप्रकरणी नाशिकरोड कारागृहात असलेल्या या टोळीने, प्लॉटचा बळजबरीने ताबा घेत 57 लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आणि जागेचा ताबा सोडण्यासाठी तब्बल दोन कोटींची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Bagul Gang News)
![]() |
| Bagul Gang News |
या प्रकरणात भाजपचे पदाधिकारी मामा राजवाडे, अजय बागुल, संजय राठी, महेश राठी आणि बाळासाहेब ऊर्फ भगवंत पाठक यांच्यासह 20 जणांविरुद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बागुल टोळीच्या अडचणींमध्ये अधिक भर पडली असून, नाशिकमध्ये पुन्हा एकदा भू-माफियांच्या दबदब्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
प्लॉटचा कब्जा आणि मारहाण; भोईर परिवाराला दिल्या जीवघेण्या धमक्या :
मूर्तिकार चंदन गोटीराम भोईर (वय 40) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी संजय राठी, महेश राठी, अजय बागुल, मामा राजवाडे, मीना लोळगे, प्रतिक लोळगे, त्याचा भाऊ आणि इतर 10-12 साथीदारांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन त्यांच्या घरात जबरदस्ती प्रवेश केला. त्यांनी प्लॉटचे तार कम्पाउंड तोडून शेड आणि मालकी हक्काचा बोर्ड पाडला आणि त्या ठिकाणी बेकायदेशीर वॉल कम्पाउंड उभारले.
या दरम्यान संजय राठी (Sanjay Rathi) आणि प्रतिक लोळगे (Pratik lolage) यांनी चंदन भोईर यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो चुकला. कुटुंबीयांनी धाव घेतल्याने त्यांचा जीव वाचला. आरोपींनी त्यावेळी शिवीगाळ, मारहाण आणि जिवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या.
Nashik Crime | 57 लाखांची खंडणी आणि दोन कोटींची मागणी; टोळीच्या धमक्या वाढल्या :
तक्रारीनुसार, आरोपींनी सुरुवातीला 57 लाख रुपयांची अवाजवी खंडणी घेतली आणि त्यानंतरही फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जबरदस्तीने ‘सुलेनामा’ करून देण्यास भाग पाडले. नंतर अजय बागुल, मामा राजवाडे आणि बाळासाहेब पाठक यांनी जागेचा ताबा सोडण्यासाठी पुन्हा दोन कोटी रुपयांची मागणी केली. मागणी न केल्यास फिर्यादीला आणि त्यांच्या कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिली गेली.
भोईर परिवार हे भगवान शंकर आणि कालिमाता पूजक असून, ते मूर्तिकलेशी संबंधित आहेत. मार्च ते ऑगस्ट 2025 दरम्यान हे संपूर्ण कुटुंब भीतीच्या छायेत राहत होते. आधी पोलिसांकडे तक्रार केली असता दिवाणी प्रकरण असल्याचे सांगून त्यांना परत पाठवण्यात आले होते. मात्र, गोळीबार आणि पंजाब बार प्रकरणांनंतर आरोपींवर कारवाई सुरू झाल्याने त्यांनी पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली.
सध्या या प्रकरणाचा तपास वरिष्ठ निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक उमेश बोरसे करत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
