Shashi Tharoor | खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील वांडूर परिसरात काही जणांनी थरूर यांच्या वाहनांचा ताफा अडवून गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. ( Shashi Tharoor News )
| खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला |
ही घटना त्या वेळी घडली जेव्हा शशी थरूर हे प्रचारासाठी वांडूर भागात पोहोचले होते. स्थानिकांच्या माहितीनुसार, अचानक 10 ते 15 जणांचा जमाव रस्त्यावर जमला आणि त्यांनी ताफा थांबवला. काही जणांनी थरूर यांच्या कारच्या काचांवर हात मारत वाहन पुढे जाऊ दिले नाही. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
गनमॅनला बाहेर खेचून मारहाण
ताफ्याला अडवण्यात आल्यानंतर सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी गनमॅन कारमधून खाली उतरले. त्यावेळी जमावातील काहींनी एका गनमॅनला कारमधून बाहेर खेचून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला. (Kerala Political News)
थरूर यांच्या टीमने हा प्रकार सुनियोजित हल्ला असल्याचा आरोप केला आहे. विरोधकांनी हा हल्ला घडवून आणल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अधिकृतपणे कोणत्याही पक्षाचे नाव समोर आलेले नाही.