पुणे ( Pune )- ई. एस.एन. पब्लिकेशन्स तामिळनाडू आणि गोवा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, गोवा या संस्थांनी शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याबद्दल पुण्याच्या डॉ. तुषार निकाळजे या शिक्षकेतर कर्मचाऱ्यास " शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार" प्रदान केला आहे.
![]() |
संशोधनात्मक कार्याबद्दल पुण्याच्या डॉ. तुषार निकाळजे या शिक्षकेतर कर्मचाऱ्यास "शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार" |
हा पुरस्कार समारंभ दि. 26 मे 2025 रोजी गोवा इंजिनिअरिंग कॉलेज, गोवा येथे संपन्न झाला. डॉ. निकाळजे यांनी आजपर्यंत 14 पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत. डॉ. निकाळजे यांनी "भारतीय निवडणूक प्रणाली" या विषयावर पीएच. डी. संशोधन केले आहे. निवडणूक प्रणाली या विषयावरील दोन पुस्तके महाराष्ट्रातील 9 विद्यापीठांच्या व 4 स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांना संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता प्राप्त आहेत . महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने वर्ष 2019 मध्ये "लोकशाही, निवडणूक व सुशासन" या विषयाचे तज्ञ म्हणून नेमणूक केली होती. तामिळनाडू येथील ईएसएन पब्लिकेशन यांनी "मा.महात्मा गांधी पुरस्कार" देऊन सन्मानित केले होते.
दृष्टिहीन व्यक्तींकरिता "अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी" हे इंग्रजी- ब्रेल पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे. या ब्रेल इंग्रजी पुस्तकाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. सामान्य प्रशासन, विद्यापीठ प्रशासन, निवडणूक प्रशासन, नागरी सेवा या विषयांवर आजपर्यंत डॉ. निकाळजे यांनी 86 लेख लिहून प्रकाशित केले आहेत. सदर लेख साप्ताहिके, मासिके, विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता प्राप्त रिसर्च जर्नल्स यामध्ये प्रकाशित झाले आहेत. चार राष्ट्रीय व तीन आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.
वर्ष 2020 मध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन व ई एस एन पब्लिकेशन्स, तामिळनाडू यांनी आयोजित केलेल्या सात दिवसांच्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेली आहे. या उपक्रमामध्ये डॉ. निकाळजे यांनी शोधनिबंध सादर केला आहे. वर्ष 2023 मध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन यांनी आयोजित केलेल्या थिकेस्ट बुक ऑफ रेकॉर्ड या उपक्रमामध्ये जगातील सर्वाधिक मोठे पुस्तक (उंची 19 फूट) नोंद झाली आहे. डॉ. निकाळजे यांनी या उपक्रमामध्ये 90 पानांचे "Sacrifice of 20 paise tea" हे पुस्तक प्रकाशित केले. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड , लंडन यांनी डॉ. निकाळजे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले होते.
त्याचबरोबर डॉ. निकाळजे यांनी चार माहितीपटांची निर्मिती व लेखन केले आहे. या माहितीपटांमध्ये क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड, रिटायर्ड बट नॉट टायर्ड, बिहाइंड द व्हाईट कॉलर हे माहितीपट, तसेच 'ओन्ली शी कॅन' या ॲनिमेशन माहितीपटाचा समावेश आहे. डॉ. निकाळजे यांना आजपर्यंत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 20 पुरस्कार मिळाले आहेत. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, तामिळनाडू, लंडन, अमेरिका, थायलंड, मलेशिया, दुबई, इंडोनेशिया इत्यादी ठिकाणच्या शैक्षणिक व संशोधन संस्थांनी डॉ. निकाळजे यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. डॉ. तुषार निकाळजे यांनी हे सर्व शैक्षणिक व संशोधनात्मक कार्य स्वखर्चाने केले आहे.
डॉ. निकाळजे 32 वर्षे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षकेत्तर - कर्मचारी ( non- teaching staff) म्हणून कार्यरत होते. ते मार्च- 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या डॉ. निकाळजे "एक देश एक निवडणूक" या विषयासंदर्भात लघु प्रकल्पाचे काम करीत आहेत. या लघु प्रकल्पाच्या माहितीद्वारे निवडणूक आयोगाचे व भारतातील दहा लाख 80 हजार मतदान केंद्रांवर असा विश्वास डॉ. निकाळजे यांनी व्यक्त केला आहे. यामुळे निवडणुकीचे काम करणाऱ्या 53 लाख 40 हजार कर्मचाऱ्यांचे कामकाजाचा ताण कमी होणार आहे . तसेच "क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड" या कॉफी टेबल बुकच्या निर्मितीमध्ये डॉ. निकाळजे व्यस्त आहेत . सेवानिवृत्तीनंतर आजही शैक्षणिक, संशोधनात्मक, लेख- पुस्तक लिखाण, लघु प्रकल्प यामध्ये व्यस्त आहेत. डॉ. निकाळजे यांचा हा प्रवास इतरांनाही प्रेरणादायी ठरणारा आहे.
यश मिळण्यासाठी सातत्य हवे
याप्रसंगी बोलताना डॉ. तुषार निकाळजे म्हणाले, "यश मिळण्यासाठी सातत्याची आवश्यकता आहे. शिक्षण, संशोधन , वाचन, लेखन, चर्चा यामध्ये मी गेली 40 वर्षे सातत्यता जोपासली आहे. प्रत्येकाने आपल्यामध्ये असलेल्या गुणांचे ध्येय साध्य करण्यासाठी त्यामध्ये सातत्य ठेवल्यास निश्चित यश प्राप्ती होते ".