वैष्णवीच्या लग्नाच्या रुखवतासाठी 1.5 लाख? IAS सुपेकरांच्या बायकोचे देखील नाव, जाणून घ्या यामागचं कनेक्शन
Vaishnavi Hagawane Case - वैष्णवीच्या वडिलांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासमोर दिलेल्या माहितीनुसार, रुखवत तयार करण्यासाठी सुपेकर यांच्या पत्नीला सुमारे 1.5 लाख रुपये दिले गेले. यातील 1 लाख रुपये चेकद्वारे तर उर्वरित 50 हजार रुपये रोखीने दिल्याचे सांगण्यात आले.
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू असतानाच आता या प्रकरणात एक मोठ वळण आलं आहे. हगवणे कुटुंबाशी कोणताही संबंध नसल्याचं सांगणाऱ्या आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीवर नव्याने गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वैष्णवीच्या लग्नात रुखवत तयार करण्याची जबाबदारी सुपेकर यांच्या पत्नीने घेतली होती, याबाबत कस्पटे कुटुंबाने मोठा दावा केला आहे.
विशेष म्हणजे, ही रक्कम वैष्णवीच्या आईच्या बँक खात्यातूनच दिल्याचा आरोप आहे. रुखवत बनवण्याच्या सूचनेमागे वैष्णवीची सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांचा सहभाग होता, असंही कस्पटे कुटुंबाने स्पष्ट केलं.
या नव्या खुलाशामुळे सुपेकर (IAS Supekar) यांच्या हगवणे कुटुंबाशी असलेल्या नातेसंबंधांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. याआधीच शशांक आणि सुशील हगवणेंना केवळ सव्वा महिन्यात शस्त्र परवाना मिळाल्यामुळे सुपेकर यांच्या प्रभावाविषयी चर्चेला उधाण आले होते. आता रुखवत प्रकरणात सुपेकरांच्या पत्नीच्या सहभागामुळे हे नातं अधिक स्पष्ट होत असल्याचे चित्र दिसत आहे.