पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! म्हाडाची बंपर लॉटरी जाहीर
MHADA Lottery 2025 | घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्या पुणेकरांसाठी आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाने फ्लॅट्स, व्यावसायिक दुकाने आणि कार्यालयीन युनिट्स विक्रीसाठी मोठी लॉटरी योजना जाहीर केली आहे. यामध्ये विक्री न झालेली घरे आता ‘पहिला अर्जदार, त्यालाच घर’ या तत्त्वावर थेट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. (MHADA Lottery 2025)
या योजनेअंतर्गत पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील ५२ व्यावसायिक दुकाने व २८ कार्यालयीन युनिट्सचा ई-लिलाव होणार आहे. याशिवाय सामाजिक आणि सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील मागील लॉटरीनंतर रिक्त राहिलेले फ्लॅट्सदेखील खुल्या विक्रीसाठी देण्यात येणार आहेत. हे फ्लॅट्स प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर वितरित होणार असल्यामुळे अर्जदारांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
घर खरेदीची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन, कागदपत्रांची पडताळणी अनिवार्य:
ही संपूर्ण प्रक्रिया https://bookmyhome.mhada.gov.in या पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड आणि स्वयंघोषणापत्राची स्कॅन केलेली प्रती अपलोड करणे बंधनकारक आहे. ही कागदपत्रे सबमिट केल्यानंतर अर्जदाराची ऑनलाईन पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर अर्जदाराला घर निवडीचा पर्याय दिला जाईल. (MHADA Lottery 2025)
सदर प्रक्रिया १० एप्रिल २०२५ पासून सुरू झाली असून अद्याप अर्ज सुरू आहेत. म्हाडाचे पुणे विभाग प्रमुख राहुल साकोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विक्री योजना प्रामुख्याने सामान्य श्रेणीतील पात्र अर्जदारांसाठी खुली असून, हे घर मिळवण्यासाठी कोणतीही सोडत न लागता सरळ खरेदी करता येणार आहे.
विक्रीसाठी ठेवलेले सर्व फ्लॅट्स पहिल्या अर्जदाराला प्रथम प्राधान्य या तत्त्वावर वितरित करण्यात येणार असल्यामुळे कोणताही विलंब न करता इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावा. तसेच, ही घरे देखील किफायतशीर दरात उपलब्ध असल्यामुळे मध्यमवर्गीयांसाठी ही योजना खास फायद्याची ठरू शकते.
योजनेबाबत अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी नागरिकांनी www.eauction.mhada.gov.in आणि www.mhada.gov.in या अधिकृत वेबसाइट्सवर भेट देण्याचे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे. (MHADA Lottery 2025)